संदीप परब हा पणदूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) इथला तरुण. बालपणापासूनच त्याला इतरांना मदत करायला आवडायचं. बेघर झालेल्या ज्येष्ठ नागरिकांविषय त्याला विशेष कळकळ वाटायची. कोकणातल्या रूढीप्रमाणेच चोविसाव्या वर्षी त्यानं मुंबई गाठली; पण इतर तरुणांप्रमाणे नोकरीसाठी नव्हे, तर समाजकार्यासाठी. मुंबईत त्यांनी परळमधल्या सोशल सर्व्हिस लीगमधून समाजसेवेविषयीचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर अखिल भारतीय महिला परिषद, गृहनिर्माण हक्क समिती आणि जुहू-सांताक्रूझमधील लोटस आय हॉस्पिटल अशा अनेक संस्थांमध्ये त्यानं काम केलं. हॉस्पिटलमध्ये तो प्रोजेक्ट मॅनेजर होता. या काळात झोपडपट्टीत समाजसेवेचंही काम सुरू होतं. झोपडपट्टीतल्या नागरिकांना पाण्याची जोडणी आणि स्वच्छताविषयक सुविधा मिळवून देण्यासाठी त्यानं मदत केली. त्या भागात फिरताना एड्सचे बळी आणि बळी गेलेल्यांची बेवारस मुलं पाहिली. त्यातल्या पाच जणांना आश्रय आश्रमात प्रवेश मिळवून दिला आणि त्यांचं पालकत्व स्वीकारलं. २००४मध्ये खार इथं अखिल भारतीय महिला परिषदेच्या श्रद्धा केंद्राच्या एका प्रकल्पात सहभागी व्हायची संधी परब यांना मिळाली. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बेघर झाल्यानं रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या तसंच अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांचं सर्वेक्षण केलं आणि या मुलांसाठी डे केअर सेंटर चालविलं. अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम समजावेत, म्हणून अनेक पथनाट्यं सादर केली. अशा मुलांना आधार दिला. त्यांचं समुपदेशन केलं. हे सारं करत असतानाच एक गोष्ट परब यांच्या लक्षात आली, ती म्हणजे मुलं आणि महिलांकरिता अनेक संस्था काम करत असल्या, तरी रस्त्याच्या बाजूला निराधार आयुष्य जगणारे ज्येष्ठ नागरिक, औषधोपचारांच्या अभावी मरणासन्न अवस्थेत राहणारी निराधार माणसं, कोणत्याही आधाराअभावी व्यसनाधीन होणारी तरुण मुलं यांच्यासाठी काम करणारी कोणतीही संस्था नव्हती. हेच काम आपण हाती घ्यायचं, असं परब यांनी ठरविलं आणि ते कामाला लागले. त्यातूनच त्यांनी जीवन आनंद ही संस्था २००७ साली त्यांनी सुरू केली. पणदूर या आपल्या मूळ गावी त्यांनी संविता आश्रम सुरू केला. मुंबईत किंवा कोकणात सापडणाऱ्या अनाथांना आधार देण्याचं काम ही संस्था २०१३ सालापासून करत आहे.